कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे. त्यामुळे गेल्यावर्षी उच्चांकी ३४०७ रुपये दर दिला आहे. आता कितीही अडचणी आल्या तरी दिवाळीपूर्वी वाढीव ऊस दराचा १०७ रुपयांचा तिसरा हप्ता देणारच, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी ६७ व्या सर्वसाधारण सभेत केली. सभेला मोठ्या संख्येने सभासद, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेपुढील आयत्या विषयासह सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. सभेकडे विरोधकांनी पाठ फिरवली होती. कारखान्याचे उपाध्यक्ष दिवंगत गणपतराव फराकटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, बदनामीसाठी वाट्टेल ते आरोप केले गेले. पण कारखान्याचा प्रती क्विंटल उत्पादन खर्च १५६८ रुपये हा इतर कारखान्यांपेक्षा सर्वात कमी आहे. मोलॅसिसची विक्री सर्वाधिक ११ हजार १८६ रुपये या दराने होते. ६८ हजार सभासदांना सवलतीची साखर देताना १३५ रुपये ९९ पैसे परत जातात. त्यामुळे साखर विक्री ३,३५४ ही कमी दराने दिसते. कारखान्याची विस्तारीकरणानंतर गाळप क्षमता ७,५०० मे. टनापर्यंत वाढवली आहे. पुढील हंगामात १०,००० टन प्रती दिन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. आर. डी. देसाई यांनी तांत्रिक माहिती पुरवली. संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.