बिद्री साखर कारखाना प्रती टन ३२०० रुपये दर देणार : कार्यकारी संचालक के. एस. चौगले

कोल्हापूर : श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदा उसाला विनाकपात प्रती टन ३२०० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी सांगितले. बिद्री येथे कारखान्याच्या ६१ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. उत्पन्न विभागणी सूत्रानुसार उसाची होणारी वाढीव रक्कम देण्याबाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक आर. डी. देसाई होते.

चौगले म्हणाले की, यावर्षी १० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. हंगामपूर्व मशिनरी देखभाल दुरुस्ती व तोडणी यंत्रणेचे नियोजन केले आहे. कारखान्याकडील ऐच्छिक ठेवींवरील १० टक्के व्याज संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली आहे. ज्यांनी अद्याप खात्याची माहिती दिलेली नाही, त्यांनी कारखान्याशी संपर्क साधून व्याजाचे धनादेश घ्यावेत.

यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीताचा प्रारंभ करण्यात आला. कार्यकारी संचालक चौगले व त्यांच्या पत्नी राधिका यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. ऊस तोडणीचा प्रारंभ मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील व वजन काट्याचे पूजन वर्क्स मॅनेजर एस. बी. भोसले यांच्या हस्ते झाले. कामगार संचालक शिवाजी केसरकर, सेक्रेटरी एस. जी किल्लेदार, एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर, पी. पी. शिंदे, शिवराज मोरे, बी. बी. पाटील, संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here