कोल्हापूर : आगामी गळीत हंगामाची साखर कारखान्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. सततच्या पावसाने आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगामात उशीर होणार आहे. बिद्री श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Bidri Sugar Factory) ६० व्या गळीत हंगामाला पुढील आठवड्यात २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरवात होणार असून त्यांचे गाळपाचे उद्दिष्ठ १० लक्ष टन इतके आहे. अशी माहिती अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. ऊसाला उच्चांकी दर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्लांट ची सुरवात २०२३ ते २०२४ पर्यंत होईल अशी माहिती दिली आहे. इथेनॉल प्लांट ची क्षमता ६० के एल पी डी अशी असेल.
को – जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया (Cogen India) यांच्या वतीने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट को – जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार बिद्री साखर कारखान्याला जाहीर झाला होता. देश पातळीवरील पुरस्कारांमध्ये या कारखान्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून बिद्री ने सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. बिद्री चा देशपातळीवरील हा सन्मान राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.