बिद्री, दि. २४ : बिद्री साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात प्रतिदिन गाळपात ९ हजार मे. टनापर्यत मजल मारत ईतिहास रचला आहे. सर्व घटकांच्या पाठबळामूळेच कारखान्याला हे घवघवीत हे यश मिळाले असून यंदा १० लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडणार असे प्रतिपादन अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात सन २०२२ -२३ हंगामात उत्पादित झालेल्या ५ लाख ५ हजार ५५१ व्या साखर पोत्यांचे पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष पाटील म्हणाले, अनेक चढ-उतार व स्थित्यंतरातून वाटचाल करीत बिद्री साखर कारखाना आजच्या घडीला राज्यातील साखर कारखानदारीत अग्रेसर आहे. व्यवस्थापनाने मोठ्या धाडसाने निर्णय घेत हाती घेतलेले कारखान्याचे विस्तारिकरण यशस्वी झाल्याचे दिसत असून चालू गळीत हंगामात सरासरी ७५०० ते ८५०० मे. टन प्रतिदिन गाळप होत आहे. यामाध्यमातून कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांचा ऊसाची उचल झाल्याने त्यांच्यामध्येही समाधान आहे.
अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, बिद्री कारखान्याने आजअखेर ५४ दिवसात ४ लाख २६ हजार ९५९ मे. टन ऊसाचे गाळप केले असून त्यापासून ५ लाख ५ हजार ५५१ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ११. ७९ टक्के राहिला आहे. तसेच सहवीज प्रकल्पातून आजअखेर ३ कोटी ३४ लाख ५० हजार २०० युनिट वीज निर्मिती झाली असून त्यापैकी १ कोटी २० लाख १५ हजार ६०० युनिट वीज कारखान्याने वापरली आहे. तर २ कोटी ८ लाख ८८ हजार ७०० युनिट वीजेची महावितरणला निर्यात झाली आहे. बिद्री कारखान्याचा चालू हंगामातील ऊस दर ३२०९ रुपये प्रतिटन असून सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवून उच्चांकी ऊसदराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अध्यक्ष पाटील यांनी केले. साखर कारखान्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याची प्रतिटन ३२०९ रुपये प्रमाणे एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सबंधीत बँक खात्यावर जमा केली
या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, प्रविण भोसले, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, मधुकर देसाई, के. ना. पाटील, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, अशोक कांबळे, संचालिका सौ. निताराणी सुर्यवंशी, सौ. अर्चना पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील- कुरुकलीकर, कामगार संचालक शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत सेक्रटरी एस. जी. किल्लेदार यांनी केले तर कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी आभार मानले.