सांगली : विश्वास साखर कारखान्याचे चांगले वाईट दिवस पाहिले आहेत त्यातून एक आदर्श संस्था निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले. साई संस्कृती सभागृहात विश्वास उद्योग समूह, राजारामबापू उद्योग समूह, यशवंत उद्योग समूह यांचा स्नेहमेळावा, निवृत्त कर्मचारी सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, राजारामबापूचे अध्यक्ष प्रतीक पाटील, विराज नाईक, रणधीर नाईक उपस्थिती होते.
माजी मंत्री पाटील म्हणाले की, सहकारी संस्था उभारताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ज्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळी साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी कामगारांनी केलेले काम महत्त्वाचे होते. लोकशाहीची प्रचंड मोठी थट्टा या लोकसभा निवडणुकीत झाली आहे. आपण काहीही करून सत्तेपर्यंत पोहोचू शकतो, असे विरोधकांनी दाखवून दिले आहे, असे सांगितले. आमदार नाईक म्हणाले की साखर उद्योगाचा ग्रामीण भागाच्या अर्थकारण प्रगतीत, तसेच शेतकरी वर्गाच्या घरातील मुलांसाठी शिक्षण प्रगतीत मोठा वाटा आहे.