विशाखापट्टणम : चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या गाळपात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदारांसमोर मोठे संकट दिसून येत आहे. उत्तर आंध्र प्रदेशमध्ये जिथे पाच साखर कारखाने आहेत, तेथील शेतकरी बहुपर्यायी पिकांकडे वळत आहेत. कारण, साखर कारखान्यांकडून त्यांना काहीच लाभ मिळत नाही. त्यांचे पैसे दीर्घकाल थकीत आहेत. वस्तूतः गेल्या काही वर्षात उसाची शेती निम्म्यावर आली आहे. यापूर्वी ४०,००० हेक्टर क्षेत्रात केली जाणारी ऊस शेती आता २०,००० हेक्टरवर आली आहे.
प्रत्येक हंगामात सर्वात जास्त गाळप करणारा गोवदा साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे. कारखान्याचे क्रशींग पाच लाख टनावरून ४ लाख टनापेक्षा कमी झाले आहे. शेतकऱ्यांसमोर ऊस बिलांची चिंता आहे. अनेक शेतकरी कारखानदारांना कमी ऊस देऊन सर्व ऊस गूळ व्यापाऱ्यांना विकत आहेत.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, सर्व तीन साखर कारखान्यांकडे ३०,००० शेतकऱ्यांचे सुमारे १० कोटी रुपये थकीत आहेत. गोवदा साखर कारखान्याकडे मदुगुला आणि चोडावरम या दोन विधानसभा मतदारसंघातील आठ तालुक्यांतील २०,००० शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. एटिकोप्पका कारखाना दरवर्षी १.२५ लाख टन उसाचे गाळप करतो. त्यामध्ये यंदा ३२,००० टनाची घसरण दिसून आली. टंडवा कारखाना २ लाख टनापर्यंत गाळप करतो. त्यातही ४०,००० टनापर्यंत घट आली आहे.