कमर्शियल सिलिंडरच्या दरात मोठी कपात, व्यावसायिकांना दिलासा

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमतीत कपात केली आहे. इंधन कंपन्यांनी फक्त व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यातसुद्धा व्यावसायिक सिलिंडरच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली होती.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर १६८० रुपये झाला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात या सिलिंडरच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या महिन्यात सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. नंतर ४ जुलै रोजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची वाढ केली होती.

आताच्या दर कपातीनंतर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर १८९५.५० वरुन १८०२.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत हा दर १६४० रुपये झाला आहे. चेन्नईत हा सिंलिंडर १८५२.५० रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर जैसे थे ठेवण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये यात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. घरगुती सिलिंडरच्या सवलत योजनेचा लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल असे केंद्र सरकारने गेल्यावर्षी जाहीर केले होते. त्यामुळे घरगुती वापराच्या इतर सिलेंडर धारकांना सबसिडी मिळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here