पुणे : महाराष्ट्रात गाळप हंगाम कधी सुरु होणार याबाबत सुरु असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून राज्यात आजपासून गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठ दिलासा मिळाला आहे. मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आज (दि.१५ नोव्हेंबर) पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या १०२ साखर कारखान्यांना यंदाच्या २०२४-२५ च्या ऊस गाळप परवाने ऑनलाइन वितरित केले. त्यामध्ये ५१ सहकारी आणि ५१ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. अन्य कारखान्यांनाही प्रस्तावातील त्रुटी दूर केल्यानंतर परवाने दिले जाणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून हे परवाने वितरित केले आहेत. यापुढे आयोगाचा तारीख बदलण्याबाबतचा अंतिम निर्णय बंधनकारक राहणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. ऊसतोड मजुरांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून ही तारीख वाढविण्याची मागणी सुरू झाली होती. त्यावर राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) १५ नोव्हेंबरची तारीख वाढविण्यास विरोध केला होता. कारण तारीख वाढविल्यास साखर कारखानदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला असता. ‘चीनी मंडी’शी बोलताना साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून मंत्री समितीने पूर्वघोषित केल्यानुसार १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यासाठी गाळप परवाने वितरित करण्यास सुरुवात केली आहे. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी साखर आयुक्त कार्यालय सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
…तर साखर कारखान्यांना गाळप परवाना देणार नसल्याचा इशारा
राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या महामंडळासाठी गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना २०२४-२५ हंगामाचा गाळप परवाना देण्यात येणार नाही, असा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. याबाबत आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे.
साखर आयुक्तांनी ९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये झालेल्या गाळपावरील उर्वरित रक्कम प्रती टन चार रुपये ही हंगाम २०२३-२४ संपल्यानंतर १५ एप्रिल २०२४ पर्यंत भरणा करावी. गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये झालेल्या गाळपावरील रुपये १० प्रतिटनापैकी पाच रुपये निधीची रक्कम ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत व उर्वरित पाच रुपये रक्कम ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरणा करावी अशा सूचना वेळावेळी दिल्या आहेत. आता २०२१-२२ मधील देय रक्कम दिली नाही तर गाळप परवाना दिला जाणार नाही, असे पत्रात नमुद केले आहे. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही डॉ. खेमनार यांनी दिल्या आहेत.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.