बिहार : भागलपुरात अवैध फटाका कारखान्यात स्फोटात १० ठार, पंतप्रधानांची नितीश कुमार यांच्याशी चर्चा

भागलपूर : बिहारमधील भागलपूरमध्ये स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याची भेट घेतली. नितीश कुमार यांच्याशी चर्चेवेळी त्यांनी पूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. पीडितांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बिहारमधील भागलपूरमध्ये झालेली घटना वेदनादायी आहे. मी जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. तेथील सद्यपरिस्थितीबाबत नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासन बचाव व मदतकार्य करीत आहे. जखमींना सर्व ती मदत देऊ.

भागलपूर जिल्ह्यातील एका घरात भीषण स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला. तर इतर नऊजण गंभीर जखमी झाले. या घरात फटाके बनविण्याचा अवैध कारखाना होता. जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी सांगितले की, विभागातील काजबलीचक परिसरात महेंद्र मंडल याच्या घरी सकाळी स्फोट झाला. त्याच्या घरासह शेजारील दोन घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. अत्याधुनिक मशीनद्वारे मदतकार्य केले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी नमुने घेतले आहेत. दहा जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here