समस्तीपूर : गेल्या काही वर्षांपासून ऊस लागवडीसाठी मजुरांची टंचाई ही मोठी समस्या बनली आहे.तसेच मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पण आता मजुरांचा तुटवडा आणि महागाई या दोन्ही संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता ऊस पिकावरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळेचीही मोठ्या प्रमाणत बचत होणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. शास्त्रज्ञांनी रविवारी कल्याणपूर येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये याची चाचणी घेतली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एस. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीन डॉ. अंबरीश कुमार, विद्यापीठाच्या ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनिलकुमार सिंग, पुसाचे ऊस शास्त्रज्ञ व मुख्य संशोधक डॉ. डी. एन. कामत, वनस्पती रोग अन्वेषक डॉ. मोहम्मद, डॉ. मिन्नतुल्ला यांनी ऊस पिकावर कार्बेंडेंझिम, थायोफिनेट मिथाइल आणि प्रोपिकोनाझोल या बुरशीनाशकांच्या मिश्रणाची फवारणी केली. आणखी १५ दिवसांनी अशी फवारणी पुन्हा करण्यात येणार आहे.
ऊस शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या आणि दाट उसात फवारणी हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. अशा स्थितीत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांची फवारणी करणे सोपे आणि फायदेशीर ठरेल. सर्व पिकांवर ड्रोनद्वारे कमी वेळेत आणि दर्जेदार फवारणी करता येते. देशात पहिल्यांदाच कृषी विद्यापीठात प्रायोगिक चाचणी घेण्यात आल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. ड्रोनद्वारे ऊस पिकांवर यशस्वी फवारणी झाल्यावर, अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय स्तरावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.