पाण्याअभावी वाळलेल्या उसाला एकरी ५० हजार नुकसान भरपाईची मागणी

पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ऊस पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. अत्यल्प पाऊस आणि खंडित विजेमुळे वाळलेला ऊस तसेच आगीच्या घटनांमध्ये जळालेल्या उसापोटी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष समितीने केली आहे. पावसाअभावी आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे वाळलेल्या उसाचे त्वरित पंचनामे करण्याची मागणीही समितीने केली. बारामती, इंदापूरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी या मागणीचे निवेदन दिले.

‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, निवेदनात म्हटले आहे कि विभागातील माळेगाव, सोमेश्वर आणि भवानीनगर या कारखान्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. यावर्षी पावसाअभावी तसेच खंडित विज पुरवठ्यामुळे ३० ते ३५ टक्के क्षेत्र पाण्याअभावी पूर्ण जळून गेले आहे. त्यामुळे सोसायटी आणि बँकांचे कर्ज काढून शेती करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे.

राज्य सरकारने संबंधित विभागामार्फत त्वरित पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये जळालेल्या उसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन नावडकर यांनी दिले. कष्टकरी शेतकरी संघटनेचे अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विक्रम कोकरे, अमित जगताप, विजय देवकाते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here