पाटणा : बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याची योजना बिहार सरकारने आखली आहे. सहकार मंत्री प्रेम कुमार यांनी भाजीपाला प्रक्रिया सहकारी संघाच्या विविध गोदामे आणि कार्यालयांच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान साखर कारखाने सुरू करण्याशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार राज्यातील सर्व बंद साखर कारखाने उघडण्यासाठी पुढाकार घेणार आहे. याबाबत न्यूज १८ हिंदीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सहकार विभाग आणि ऊस उद्योग विभागाने आता बिहारमधील बंद साखर कारखाने सहकारी संस्थांमार्फत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री प्रेम कुमार यांनी सांगितले की, गुजरात आणि महाराष्ट्रातील साखर कारखाने बहुतेक सहकारी संस्थांद्वारे चालवले जातात. त्याच धर्तीवर बिहारमध्ये पुन्हा साखर कारखाने सुरू केले जातील. लालूप्रसाद यादव यांच्या कारकिर्दीत बंद पडलेल्या सर्व साखर कारखाने चालविण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. लवकरच सहकारी माध्यमातून गोपालगंजमधील सासा-मुसा साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उत्तर बिहारमधील सर्व बंद कारखान्यांबाबत विभाग बैठक घेईल आणि सर्व कारखाने सुरू करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या सहभागाने एक योजना तयार करेल.