गोपालगंज :पावसाळी वातावरणात ऊस पिकावर किडींचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर ऊस विकास विभाग आणि साखर कारखान्यांनी याकडे लक्ष दिले आहे. सिधवालिया येथील भारत साखर कारखान्याने ऊस पिकाचे पावसाळी किडींपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी मोहीम सुरू केली आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापन ड्रोनची मदत घेत आहे. सिधवलिया विभागामधील शहापूर गावात मंगळवारी कारखान्याच्या ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे कीटकनाशकांची फवारणी केली.
को ०२३८ या प्रजातीच्या ऊस पिकाची प्रथम ऊस विभागाचे उपाध्यक्ष संजीव शर्मा यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. सरव्यवस्थापक विकास चंद्र त्यागी आणि सह सरव्यवस्थापक आशिष खन्ना यांनी सांगितले की, पिकांवर पावसाळी किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी औषधांची फवारणी केली जात आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी उसाला पाणी देण्याचा सल्ला दिला जात आहे. उसाच्या पानांवर फवारणी करून पावसाळी किडीचे नियंत्रण करता येते. दरम्यान, प्राणघातक लाल सड रोगासह इतर किड-रोगांपासून ऊस पिकाला वाचवता येते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऊस विकास अधिकारी संतोष कुमार सिंग, ऊस व्यवस्थापक वायपी राव, प्रमोद सिंग, मनोजकुमार सिंग यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.