बंद पडलेला रिगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. त्यामुळे शेतकरीही खुश आहेत. बिहारमधील सीतामढीतील रिगा साखर कारखान्याच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे.
याबाबत, नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रिगा साखर कारखान्याच्या लिलावासाठी याच्याशी संबंधीत नीरज जैन यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कारखान्याच्या लिलावाबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू राहिल.
याआधी बंद पडलेला रीगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्र्यांसमोर करण्यात आले होते. आता पुन्हा हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
साखर कारखाना बंद पडल्याने हजारो शेतकरी निराश झाले होते. मात्र, आता त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे. लिलावानंतर कारखान्याचे कामकाज सुरू होईल आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असे शेतकऱ्यांना वाटते.