पिपरासी : गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे, पाऊस सुरू आहे. पावसामुळे भाताच्या पिकाला फायदा होत असून लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. विभागातील सेमरा लबेदा, मंझरिया, सौराहा, डुमरी मुडाडीह, डुमरी भगडवा, बलुआ ठोरी, पिपरासी पंचायतीसह विविध ठिकाणी शेतात उभा ऊस भुईसपाट झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतातील ऊस पडल्याने शेतकऱ्यांना उंदरांची चिंता सतावत आहे. पडलेल्या उसाची वाढ खुंटते आणि अशा उसाला उंदरांकडून नुकसान होण्याचा धोका वाढतो. कारखान्याला ऊस पुरवठा करताना त्याचे वजनही घटते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाचा खर्च वसूल करणेही शक्य होत नाही.
शेतकऱ्यांनी सांगितले की, प्रचंड कडक उन्हाळा असूनही शेतकऱ्यांनी ऊस पिक वाचवले होते. मात्र, वादळी वाऱ्याने या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी अशा प्रकारचा पाऊस पहिल्यांदाच कोसळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येथील परमानंद कुशवाहा, सर्वेश कुशवाहा, नीरज कुशवाहा, मनोज चौरसिया, नंदकिशोर शर्मा आदींसह शेतकऱ्यांचे ऊस पडून नुकसान झाले आहे.