मुझफ्फरपूर : बिहारमध्ये ऊस, साखर आणि इथेनॉल उत्पादन वाढीसाठी गतीने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. आता राज्य सरकारने बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे चांगले बियाणे उत्पादनासाठी अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऊस विभागाने विशेषतः मुझफ्फरपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखली आहे. सहकार विभागाच्या मदतीने ही योजना पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गत, ऊस उत्पादनाला चालना देण्याबरोबरच, चांगले उत्पादन देणाऱ्या उसाच्या जातींवर आधारित बियाणे तयार करण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातील.
तिरहुत विभागाचे सहाय्यक संचालक (ऊस) चक्रपाणी नारायण दामोदर यांनी सांगितले की, अलीकडेच रीगा साखर कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. शेजारील जिल्ह्यांमध्येही साखर कारखाने सतत सुरू आहेत. शिवाय, सरकारने खांडसरी (गुळ) उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार ऊस उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे. सरकार सुधारित जातींच्या मूळ बियाण्यांचे उत्पादन वाढवू इच्छिते. शेतकऱ्यांना मूळ बियाण्यांच्या उत्पादनावर प्रती हेक्टर ६० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. ऊस विभाग सहकार विभागाच्या मदतीने अनुदानाची रक्कम देईल.
ते म्हणाले की, सीतामढी व्यतिरिक्त, या योजेत विशेषतः मुझफ्फरपूर आणि वैशाली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या वर्षी मुझफ्फरपूरमध्ये १३९५.४० हेक्टर आणि वैशालीमध्ये ५२.०२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. औराई, साक्रा आणि मुरौल वगळता जिल्ह्यातील उर्वरित सर्व १३ गटांमध्ये उसाची लागवड केली जाते. मोतीपूर, साहेबगंज, मीनापूर आणि कांती येथे उसाची सर्वाधिक लागवड होते. वैशाली जिल्ह्यातील वैशाली, लालगंज आणि पाटेपूर येथेही उत्पादन केले जाते. म्हणून हे जिल्हे प्राधान्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.