पाटणा : बिहारमध्ये ऊस दर निश्चित न करता यंदाचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ज्या दराने ऊस खरेदी केला होता, तोच दर २०२२-२३ मध्ये लागू करण्यात आला. ऊस दरात वाढ न झाल्याने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत नुकसान सोसावे लागले आहे. ऊस उद्योग विभागाने साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेवून ऊस दर निश्चिती करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. मात्र, हंगाम संपला तरीही ऊस दर वाढीची शेतकऱ्यांना केवळ प्रतीक्षाच करावी लागली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्य सरकार आणि कारखानदारांमध्ये एकमत होऊ न शकल्याने नव्या हंगामासाठी दरनिश्चिती होऊ शकली नाही. जुन्या दरानेच शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात आली. राज्यात १५ ऑक्टोबर ते १५ एप्रिल या काळात गळीत हंगाम असतो. विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसापोटी ८५ टक्क्यांहून अधिक ऊस बिले देण्यात आली आहेत. राज्यात चांगल्या प्रतीच्या, हंगामी ऊस लागवडीला ३३५ रुपये प्रती क्विंटल दर देण्यात येतो. तर ३१० रुपये आणि २८२ रुपये प्रती क्विंटल या दराने सामान्य व निम्न प्रजातीचा ऊस खरेदी केला जातो. देशात फक्त पंजाबमध्ये प्रती क्विंटल २० रुपये दरवाढ यंदा करण्यात आली.
दरम्यान, राज्यात पूर्वी २८ साखर कारखाने सुरू होते. मात्र, त्यापैकी फक्त ९ कारखाने सध्या सुरू आहेत. हे सर्व कारखाने खासगी आहेत. पश्चिम पंचारण्यमधील बगहा, लौरिया, रामनगर, नरकटियागंज व मंझोलिया या कारखान्यांचा यात समावेश आहे. एचपीलीएल सुगौली, मोतीहारी विष्णुपूर, सिधवलिया साखर कारखाना, गोपालगंज तथा हसनपूर साखर कारखाना समस्तीपूर हे इतर कारखाने आहेत. सद्यस्थितीत सासामुसा साखर कारखाना आणि गोपालगंज तथा रिगा साखर कारखाना सितामढी बंद आहे.