पाटणा : बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनावर लावण्यात आलेली मर्यादा (cap) हटवावी अशी मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. राज्यात मक्का आणि खराब तांदळाची जादा उपलब्धता असल्याने मंजूर असलेल्या कोट्यापेक्षा अधिक उत्पादन करण्याची क्षमता आहे असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पाटणा येथे कापड आणि चर्मोद्योग गुंतवणूक प्रोत्साहन धोरणावर आयोजित एका भाषणात अशी मागणी केली की, बिहारला इथेनॉल उत्पादनासाठी मर्यादित कोट्यामध्ये ठेवले जावू नये. राज्यांसाठी हा कोटा इथेनॉलच्या खपावर आधारित आहे. कुमार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. बिहारचा कोटा वाढवावा असा प्रस्ताव नितीन गडकरी यांनीही दिला होता. ते इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात भारताने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे आपले उद्दीष्ट गाठल्याचा उल्लेख केला होता. आणि हे लक्ष्य पाच महिने आधीच गाठले आहे. उद्योग मंत्री शाहनवाज हुसैन यांनी सांगितले की, राज्याकडे इथेनॉल उत्पादन क्षेत्रासाठी ३०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत. बिहारमध्ये १७ इथेनॉल योजना स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यातील एक प्लांट सुरू झाला आहे. आणखी एका प्लांटमध्ये काही अडचणी आल्या आहेत. तर १५ प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.