पाटणा : बिहारमध्ये मोठ्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी खनिजांची वैविध्यता नसली तरी येथील पाण्याचा समृद्ध साठा, धान्य आणि उसाचे मुबलक उत्पादन यामुळे बिहार इथेनॉल उत्पादनाचे हब बनण्याच्या मार्गावर आहे. कृषी-समृद्ध बिहारने अलिकडेच इथेनॉल उत्पादन क्षेत्रात प्रवेश करून आपल्या संसाधनांचा वापर करण्याची नवी संधी शोधली आहे. भारत सरकारच्या नव्या इथेनॉल धोरणांतर्गंत बिहारमध्ये १७ मोठ्या योजनांवर काम सुरू आहे. यापैकी दोन योजनांचे उद्घाटन झाले आहे आणि इतर काही योजना पुढील काही महिन्यात सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ७ मे २०२२ रोजी पुर्णियामध्ये बिहारच्या पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले होते. त्याची क्षमता प्रती दिन ६५,००० लिटर इथेनॉल उत्पादनाची आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर्षी, ६ एप्रिल २०२३ रोजी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूरमध्ये राज्यातील द्वितीय इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले होते. या प्लांटमध्ये मक्का आणि तांदळापासून प्रती दिन ११० किलो लिटर इथेनॉल उत्पादन करता येते.
बिहारचे अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) संदीप पौंडरिक यांनी ‘टीओआय’ला सांगितले की, १७ प्लांटपैकी पाच आधीच सुरू करण्यात आले आहेत. पौंडरिक म्हणाले की, मक्का आणि पाण्यासह कच्च्या मालाची विपुलता असल्याने बिहार देशाचा इथेनॉल हब बनण्यासाठी तयार आहे. इंधन वितरण कंपन्यांनी १,०८० KLPD (किलो लिटर प्रती दिन) क्षमतेसह १७ युनिटसोबत १० वर्षांच्या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या युनिट्समधून हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. रोजगार संधीमुळे बिहारच्या लोकांना बाहेर जाण्यापासून परावृत्त करता येईल.
राज्याचे उद्योग मंत्री समीर महासेठ यांनी सांगितले की, एकूण १२ विभागांनी बिहारमध्ये इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी समन्वय साधला आहे. मंत्री म्हणाले की, राज्यात इथेनॉल उत्पादनासाठी अपार शक्यता आहेत. बिहारमध्ये दरवर्षी ३५ लाख मेट्रिक टन मक्का उत्पादन केले जाते. हे उत्पादन देशात सर्वाधिक आहे.
राज्याचे माजी उद्योग मंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, बिहार मुख्यत्वे नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैव इंधनाचे राष्ट्रीय धोरण २०१८ मुळे इथेनॉल हब बनले आहे. यामध्ये मक्का आणि खराब तांदळापासून इथेनॉव उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे.