पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवार मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूरमध्ये बिहारमधील दुसऱ्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. या प्लांटची क्षमता मक्क्यापासून प्रती दिन ११० किलो लिटर इथेनॉल उत्पादन करण्याची आहे. यासाठी १५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्लांटमधून कमीत कमी ७०० लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात पूर्णियामध्ये राज्यातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले होते. बिहारमध्ये एकूण १७ इथेनॉल युनिट्सना मंजुरी देण्यात आली आहे.
मोतीपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नितीश कुमार म्हणाले की, भोजपूर आणि गोपालगंजसह राज्यात विविध ठिकाणी १५ आणखी इथेनॉल प्लांट्सचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, आम्ही २००७ मध्ये उसापासून इथेनॉल उत्पादनाचे धोरण तयार केले आणि आमच्याकडे ३१,००० कोटी रुपयांचे प्रस्ताव आले होते. मात्र, तत्कालीन केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिली नाही. केंद्र सरकारने सांगितले की, साखर उत्पादन करण्यासाठी इथेनॉलऐवजी ऊस उपलब्ध करणे आवश्यक होते. आम्हाला २०२० मध्ये समजले की, केंद्र सरकार इथेनॉल उत्पादनावर धोरण तयार करीत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आणि त्यांना बिहारमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी २००७ पासून सुरू असलेल्या आमच्या सर्व प्रयत्नांची माहिती दिली.
बिहार सरकारने मार्च २०२१ मध्ये इथेनॉल उत्पादन प्रोत्साहन धोरण सुरू केले, ज्यापासून हे जैव इंधनाचे राष्ट्रीय धोरण २०१८ च्या अंतर्गत आपले इथेनॉल प्रोत्साहन धोरण असलेले हे देशातील पहिले राज्य बनले आहे. राज्याच्या इथेनॉल धोरणाने अतिरिक्त मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. आधी केवळ उसापासूनच इथेनॉल उत्पादनाची परवानगी होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, ऊस, मक्का आणि तुकडा तांदळाचा वापर करुन इथेनॉल उत्पादन घेतले जावू शकते असे आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. आम्ही बिहारमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मागितले आणि आम्हाला १५२ प्रस्ताव मिळाले. मात्र, केंद्र सरकारने अशा फक्त १७ प्लांट्सला मंजुरी दिली आहे. राज्यात आणखी १५ ठिकाणी इथेनॉल प्लांट उभारणीचे काम गतीने सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरा येथील ५ लाख लिटर प्रतीदिन क्षमतेचा इथेनॉल प्लांट उद्घाटनासाठी तयार आहे. हा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्लांट असेल. याशिवाय, गोपालगंज आणि नालंदा जिल्ह्यात दोन दोन प्लांट, भागलपूरमध्ये एक प्लांट उभारणीचे काम सुरू आहे.