शामली: जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्यावतीने ऊस सर्व्हेक्षण शनिवारपर्यंत पूर्ण होईल. या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे ऊस लागवड क्षेत्र अडीच हजार हेक्टरपर्यंत कमी होईल अशी शक्यता आहे. थानाभवन साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्र अंबाला-शामली आणि दिल्ली-डेहराडून ग्रीन फिल्ड इकॉनॉमी कॉरिडोरमध्ये आणि शामली कारखाना कार्यक्षेत्रात हायवे आणि बायपास मार्गाच्या चारीबाजूंनी निवासी कॉलन्या विकसित झाल्याने ऊस क्षेत्र घटले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाने २० एप्रिलपासून २० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखाने आणि ऊस विभागाची पथके स्थापन करून ऊस क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. शामली, थानाभवन आणि ऊन कारखान्याच्या संयुक्त पथकांनी शेतामध्ये जाऊन सर्वेक्षण केले. शामली कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या एक वर्षात हायवे आणि बायपासनजीक निवासी कॉलन्या विकसित झाल्या आहेत. त्यामुळे ऊस क्षेत्र कमी झाले आहे. तशीच स्थिती थानाभवन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंबाला-शामली आणि दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक एक्स्प्रेस वे साठी गेलेल्या जमिनीमुळे निर्माण झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वीस हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टरचे सर्वेक्षण झाल्याची माहिती सरव्यवस्थापक दीपक राणा यांनी दिली.
थानाभवन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक लेखपाल सिंह यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २४,५०० हेक्टरमध्ये ऊस होता. १४१ गावात २४ हजार हेक्टरमध्ये सर्व्हे झाला आहे. येथे ५०० हेक्टरमधील ऊस क्षेत्र घटले आहे. ऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १४६ गावांमध्ये २३८०० हेक्टरपैकी २३,६०० हेक्टरमध्ये ऊस लागवड झाली आहे. येथे २०० हेक्टरने ऊस क्षेत्र कमी झाले आहे. शनिवारपर्यंत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी दिली.