बिजनौर: ऊसाची थकबाकी आणि ऊस दर जाहीर न झाल्याच्या निषेधार्थ भारतीय किसान युनीयनच्या कार्यकर्त्यांनी बिजनौर साखर कारखान्यासमोर निदर्शने केली. ट्रॅक्टर्सवर काळे झेंडे लावून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलनाबाबत गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.
भारतीय किसान युनीयनचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर सिंह यांनी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी परेडमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले जाईल.
प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टर आणि अकरा शेतकरी यात सहभागी होतील. युनीयनच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी ऊस दर जाहीर न झाल्याच्या निषेधार्थ ट्रॅक्टर्सवर काळे झेंडे लावून आंदोलनास सुरुवात केली. गुरुवारी बिजनौर आणि बिलाई येथील साखर कारखान्यासमोर अनेक गावांतील शेतकरी काळे झेंडे लावून ट्रॅक्टर घेऊन आले होते. भारतीय किसान युनीयनचे कार्यकर्ता दीपक तोमर, शिवम बालियान, विजेंद्र सिंह, अमित कुमार आदींनी बिजनौर साखर कारखान्यात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जोपर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत जिल्ह्यात एकाही मंत्र्याचा कार्यक्रम होऊ देणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे, मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यांचे पालक मंत्री अथवा अन्य कोणत्याही मंत्र्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला. शुक्रवारी लोकप्रतिनिधींना पत्रे पाठवून शेतकरी कायद्यांबद्दल आपली भूमिका मांडली जाईल असे सांगण्यात आले.