कोरोनाच्या काळापासून जगाने भारताचे कौतुक केले आहे. भारत देश ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल करत आहे. अर्थव्यवस्थेचा हा वेग यापुढेही कायम राहील असा विश्वास अब्जाधीश आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक तसेच बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स त्यांच्या ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत की भारत भविष्यासाठी प्रेरणादायक आहे. ते पुढे म्हणाले की भारताने हे सिद्ध केले आहे की जग अनेक संकटांचा सामना करत असले तरीही भारत एकाच वेळी मोठ्या समस्या सोडवू शकतो. त्यांचा विश्वास आहे की योग्य नवकल्पना आणि वितरणाच्या चॅनलसह एकाच वेळी अनेक मोठ्या समस्यांवर मात करू शकेल, हे भारताने स्वतः सिद्ध करून दाखवले आहे.
आजतकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एएनआयच्या द स्टेट्समनवर प्रकाशित अहवालात म्हटले आहे की, बिल गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की संपूर्ण भारत मला भविष्यासाठी प्रेरणा देतो. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याच्या मार्गावर आहे आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपण बहुतेक समस्या मोठ्या प्रमाणावर सोडवल्याशिवाय दूर करू शकत नाही. असे असले तरी भारताने हे सिद्ध केले आहे की, देश सर्वात मोठे आव्हान हाताळण्यास सक्षम आहे. भारताची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. भारताचे कौतुक करताना बिल गेट्स यांनी आपल्या लेखात भारताने राबविलेल्या अनेक मोहिमांचा उल्लेख केला, ज्या मैलाचे दगड ठरल्या आहेत. त्यांनी पुढे लिहिले की, भारताने पोलिओचे निर्मूलन केले आहे, एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यात यश मिळवले आहे, गरिबी कमी करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. याशिवाय, भारतातील बालमृत्यू दर कमी झाला आणि स्वच्छता आणि आर्थिक सेवांमध्ये प्रगती केली आहे. बिल गेट्स जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, बिल गेट्सची यांची एकूण संपत्ती १०५.६ अब्ज डॉलर एवढी आहे.