सातारा : किसन वीर कारखान्याकडे २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या ४ लाख ६० हजार ५४६ मेट्रिक टन उसाचे बिल ११९ कोटी ७४ लाख २० हजार ६१४ रुपये यापूर्वीच प्रतिटन २ हजार ६०० रुपयांप्रमाणे जमा केलेले होते. एफआरपीप्रमाणे उर्वरित ५० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारे २ कोटी ३० लाख २७ हजार ६६७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केल्याची माहिती उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले कि, किसन वीर कारखान्याची रिकव्हरी ११.७० टक्के आहे. एफआरपीप्रमाणे दर २६५० रुपये प्रति टन होतो. त्यानुसार ऊस बिलाची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार शिस्तबद्धपणे सुरु असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. किसन वीर व खंडाळा कारखान्यातील येणाऱ्या गळीत हंगाम २०२३ – २४ दृष्टीने सर्व अंतर्गत कामे पूर्णत्वास आली असून, यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ऊसतोडणी यंत्रणेचे करार झालेले आहेत. आगामी गाळप हंगामात शेतकऱ्यांनी दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.