जगातील टॉप १० अब्जाधिशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. दीर्घ काळापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेले भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अमेझॉनचे जेफ बेजोस हे त्यांच्या पुढे पोहोचून जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मात्र, दोन्ही अब्जाधिशांच्या संपत्तीमध्ये फार थोडा फरक आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेले गौतम अदानी आता तिसऱ्या क्रमांकाचे नव्हे तर चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत बनले आहेत. त्यांच्या नेटवर्थमध्ये झालेल्या घसरणीमुळे हा बदल घडला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अदानी ग्रुपचे चेअरमन आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत ९१२ मिलियन डॉलरची घट झाली आहे.
आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अदानी यांच्या नेटवर्थमध्ये घट होवून ती ११८ अब्ज डॉलरवर आली आहे. तर अमेझॉनचे जेफ बेजॉस यांच्या नेटवर्थमध्ये ५.२३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची संपत्तीही ११८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, २०२२ मध्ये गौतम अदानी जगातील श्रीमंतांमध्ये सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती आहेत. वर्षभरात त्यांच्या नेटवर्थमध्ये ४० अब्ज डॉलरची वाढ दिसून आली होती. सद्यस्थितीत १८२ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. तर १३२ अब्ज डॉलर नेटवर्थसह इलॉन मस्क द्वितीय क्रमांकावर आहेत. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे १११ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स सहाव्या क्रमांकावर आहेत. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आहेत.