भोगावती कारखान्याकडून २२ कोटींची बिले अदा : अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शाहूनगर, परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ डिसेंबरअखेरची उसाची २१ कोटी ७७ लाख रुपयांची बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केली आहेत. कारखान्याने प्रती टन ३२०० रुपये दराने ही बिले दली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. कारखान्याच्या संचालक मंडळाने काटकसरीचा व शिस्तबद्ध कारभार केला आहे. गतिमान कारभारामुळे ऊस गाळपही वेगाने होत आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष प्रा. पाटील म्हणाले की, कारखान्याने यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने ३६ दिवसांत १,६१,२९० टन उसाचे गाळप करून १,८१,६४० साखर पोती उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के एवढा आहे. या पंधरवड्यातील गाळप झालेल्या ६८,०५२ टन उसाची २१ कोटी ७७ लाख ६७ हजार ४६१ रुपयांची बिले बँक खात्यांवर वर्ग केली आहे. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here