पुणे : साखर कारखान्यांना बी मोलॅसीस, उसाचा रस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी ऑगस्ट महिन्यात उठवण्यात आली. इथेनॉल निर्मितीचा दर सध्या प्रती लीटर ६५ रुपये ६० पैसे आहे. तरीदेखील राज्यातील काही कारखानदार इथेनॉल निर्मितीला विरोध करत असल्याचा आरोप जैवइंधन शेतकरी संघटनेने केला आहे. एफआरपीमधून होणारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साखर निर्मितीऐवजी थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी सरकारने द्यायला हवी अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देसाई म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत सर्वाधिक ऊस उत्पादन जास्त आहे. इथेनॉलचा सध्याचा दर लक्षात घेता उसाला प्रती टन ४,५०० ते ५,५०० रुपये दर मिळू शकतो. परंतु महाराष्ट्रातील काही साखर कारखानदारांकडूनच कायमपणे इथेनॉल धोरणाला विरोध होत आहे. खरेतर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती क्षेत्रात कार्पोरेट उद्योगांनी उतरवावे. त्यामुळे उसाला प्रतिटन एफआरपी रुपये ३,००० ऐवजी अधिक मिळू शकतो. इथेनॉल निर्मितीतून प्रतिटन ४,५०० ते ५,५०० रुपये एवढा दर मिळू शकतो. पण इथेनॉल निर्मितीला आपलेच लोक विरोध करत आहेत, जे दुर्दैवी आहे, असे देसाई म्हणाले.