पुणे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या तीन कामगारांनी बायोमेट्रिक हजेरीप्रश्नी शुक्रवारी (दि. १६) कारखान्याच्या चिमणी (बॉयलर) वर चढून सुमारे दहा तास शोले स्टाईल आंदोलन केले. तात्या शेलार, संतोष तांबे, महेंद्र काशिद यांनी हे आंदोलन केले. तीन महिन्यांपूर्वी कामगारांनी थकीत वेतन मिळावे यासाठी आंदोलन केले. त्यावेळी व्यवस्थापनाने काही महिन्यांचा पगार देऊ, असे सांगून तडजोड केली होती. मात्र शुक्रवारी कारखाना व्यवस्थापनाने अचानक बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी बंद ठेवल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला.
गेल्या १६ महिन्यांपासून कारखाना व्यवस्थापनाने सर्वच कामगारांचे पगार थकीत ठेवले आहेत. त्यामुळे संतप्त कामगारांपैकी तात्या शेलार, संतोष तांबे, महेंद्र काशिद या तीन कामगारांनी सकाळी कारखान्याच्या बॉयलरवर चढून घोषणाबाजी सुरू केली. कामगारांना खाली उतरण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. ‘आम्हाला न्याय द्या; अन्यथा आम्ही जीव देऊ,’ असे हे कामगार सांगत होते. पोलिस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कारखाना व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे कामगार आयुक्त शैलेश पोळ यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, घोडगंगा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दादा पाटील फराटे आदींनी आंदोलक कामगारांना फोनद्वारे याची माहिती देत खाली उतरवले.