युपी : ऊस समिती स्थापन करणार शेतकरी कल्याण निधी

बिसलपूर : सहकारी ऊस विकास संस्थेच्यावतीने यंदा शेतकरी कल्याण निधी स्थापन केला जाणार आहे. या निधीतून गरजू ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. ‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सद्यस्थितीत सहकारी ऊस विकास संस्थेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे समितीने शेतकरी कल्याण निधीची योजना आखली आहे. या आराखड्यानुसार समिती प्रशासन प्रत्येक गळीत हंगामात आपल्या ९६ हजार शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १ रुपये शेतकरी कल्याण निधीत जमा करणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी व समितीच्या सचिवांच्या संयुक्त स्वाक्षरीने यासाठी बँकेत खाते उघडण्यात येणार आहे.

या निधीतून अत्यंत गरीब शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांच्या शिक्षणासाठी आणि शेतकऱ्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी प्रामुख्याने अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी पात्र असतील. याची अंमलबजावणी करण्यासाठी समिती प्रशासनाने १ सप्टेंबर रोजी दुपारी समितीच्या आवारात वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. याबाबत बिसलपूर समितीचे सचिव आर. पी. कुशवाह यांनी सांगितले की, शेतकरी कल्याण निधीची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवला जाईल. नवीन गळीत हंगामात योजनेची अंमलबजावणी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here