सांगली : भाजप किसान मोर्चाने ऊस आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली शहरातून होणारी ऊस वाहतूक रोखणार असल्याचा इशारा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आर्थिक क्षमता असूनही बड्या कारखानदार नेत्याच्या दबावाखाली कुणीही कोंडी फोडायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
पृथ्वीराज पवार म्हणाले, गेल्या हंगामात कारखान्यांनी बहुतांश साखर ३९ रुपये किलोने विकली आहे. मधल्या टप्प्यात दर कमी होता, मात्र उपपदार्थ आणि साखर दराचा हिशेब पाहता अंतिम हप्ता ४०० रुपये देणे शक्य आहे. कोणत्या कारखान्याने किती दराने साखर विक्री केली याबाबत स्पष्टता येण्याची गरज आहे. मी जयसिंगपूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन ऊस आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्याकडे पाठवला आहे. सद्यस्थितीत सांगली व कोल्हापूर येथील काही कारखानदारांनी अंतिम हप्ता देवून कोंडी फोडण्याची तयारी दर्शवली आहे. चालू हंगामातील पहिली उचल देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. मात्र एका बड्या कारखानदाराने त्यात आडकाठी आणली आहे असा आरोप पृथ्वीराज पवार यांनी केला.