अहमदनगर : नेवासे तालुक्यातील मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना स्थळावर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 2020-21 या हंगामातील गळिताची कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत मिळावी व 2022-23 च्या गाळप हंगामात उसाला तीन हजार दर मिळावा आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनप्रसंगी भाजपचे अनिल ताके, अंकुश काळे, प्रताप चिंधे, ज्ञानेश्वर पेचे, येडू सोनवणे, लहुजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर, अशोक कोळेकर, स्वप्नील गरड, कैलास दहातोंडे, संतोष काळे, अशोक टेकणे, बाबासाहेब रोडगे, मिरा गुंजाळ, ज्ञानदेव पाडले आदींनी ऊस दरावरून भाषणे झाली.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उसाला प्रतिटन तीन हजारांचा दर द्यावा व ठेवीवरील 17 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली. भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, बाबा कांगुणे, डॉ. रावसाहेब फुलारी, विष्णू गायकवाड, दतात्रय लांघे, बाळासाहेब क्षीरसागर आदींचा आंदोलनात सहभाग होता.
मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी एफआरपी प्रमाणे 2022-23 चे पेमेंटमधील उर्वरित रक्कम 127.88 रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी ठेवीतील कपातीची रक्कम मागणी केल्यास आर्थिक उपलब्धतेनुसार देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात तसे लेखी पत्रही आंदोलकांना यावेळी दिले.