कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्ता काळात सर्वच घटकांचे सहकार्य मिळाले. संचालकांनी काटकसरीने कारभार चालवला. यापुढेही कारखान्याचे संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकरांचा आदर्श घेऊन काम केले तर कोणतीच अडचण भासणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांचे सहकार्य लाभले म्हणूनच चांगला कारभार करू शकलो, असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील – कौलवकर यांनी केले.
कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी पाटील – कौलवकर बोलत होते. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक पी. डी. धुंदरे, ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर हे प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचे संचालक विश्वनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सौ. सविता पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला.
पाटील म्हणाले, शासन धोरणामुळे यापूर्वीची व आत्ताची साखर कारखानदारी यात फरक आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, हाच उद्देश आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नितीन पाटील, विजय भोसले, सर्जेराव पाटील, संतोष पोर्लेकर, पांडुरंग भांदीगरे, नेताजी चौगले उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले. आभार संचालक प्रा. सुनील खराडे यांनी मानले.