सोलापूर : काही राजकारण्यांमुळे सिध्देश्वर साखर कारखाना अडचणीत आला असून काडादी परिवार अडचणीतून मार्ग काढत आहे. शेतकऱ्यांनी काडादी यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले.श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गाळप हंगामासाठी आयोजित करण्यात आलेल्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यावेळी साठे बोलत होते.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने टिकले पाहिजेत. राजशेखर शिवदारे म्हणाले की, साखर उद्योग अडचणीत असतानाही काडादींनी कारखाना यशस्वीपणे चालविला आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना यशस्वी चालवत आहेत. कायम शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या परिवाराने काम केले आहे. सिध्देश्वर कारखान्याने ५२ वर्षात मोठा विश्वास संपादन केला आहे. इतक्या वर्षात शेकडो कुटूंबाला उभारी देण्याचे काम सिध्देश्वर कारखान्याकडून झाले आहे.
धर्मराज काडादी म्हणाले की, शेंडगे या शेतकऱ्याने आजतागायत सिध्देश्वर शिवाय अन्य कारखान्याला ऊस घातला नाही. म्हणूनच त्याच्या हस्ते गाळप शुभारंभ केला आहे. बारा लाख ऊसाच्या गाळपाचे उद्दीष्ट यंदा ठेवले आहे. सहकार चळवळ टिकणे अवघड होत आहे. सरकारी धोरणामुळे ही चळवळ मोडीत निघेल. प्रत्येक प्रक्रियेसाठी सरकारशी भांडावे लागते. गत वर्षीच्या गाळपातील रक्कम दिवाळीच्या आधी देणार आहोत. २०१४-१५ पासून कारखान्याला त्रास दिला जात आहे. चिमणी पाडतील अस वाटलं नव्हतं. सिध्देश्वर कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी महादेव चाकोते, अध्यक्ष पुष्कराज काडादी, शिवानंद दरेकर, आप्पाराव कोरे, गुरूसिध्द म्हेत्रे, शिरीष पाटील, हरिश पाटील, भारत जाधव, संगमेश बगले-पाटील, सुभाष पाटील, विद्यासागर मुलगे, चंद्रकांत कराळे, नरसप्पा दिंडोरे, संजीव पाटील, बाबूराव पाटील, श्रीराम पाटील, सिध्दाराम चाकोते, सिध्दाराम व्हनमाने यांच्यासह अन्य उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.