बारामती: बारामती शुगर कारखाना, दौंड शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, पारवडी या गावांमधील ऊस गाळपासाठी जातो. येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे ऊस क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. यावर्षी या परिसरात ऊसतोडणीसाठी मजुरांची संख्या वाढवणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने ऊसतोडीस उशीर होत आहे. ऊस तुटून जाण्यास उशीर झाला तर एकरी उत्पादनात खूप मोठी घट होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. शिवाय, रब्बी हंगामातील पिकांनाही विलंब होणार आहे. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शिर्सुफळ (ता. बारामती) परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी कारखाना व्यवस्थापनांकडे चकरा मारत आहेत.
सद्यस्थितीत, साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन महिना संपायला आला तरी अनेक शेतकऱ्यांच्या आडसाली उसाला तोड आली नाही, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. साखर कारखान्यांनी ऊस तोडणी टोळ्यांची संख्या किंवा यंत्रणा वाढवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, ऊस लागवडीनंतर कारखान्याकडे लागवड नोंदी दिल्या जातात, तेव्हा त्या तारखांमध्ये घोळ केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ऊस लागवडीनंतर नोंदी घेण्याचे काम पारदर्शी व्हायला हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर साखर कारखान्यांनी सभासद नोंदणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत शिर्सुफळ
येथील शेतकरी संतोष आटोळे म्हणाले की, आम्ही कित्येक वर्षांपासून माळेगाव कारखान्याकडे सभासदत्वासाठी हेलपाटे मारत आहोत. परंतु अद्याप आम्हाला वंचित ठेवले आहे. याचबरोबर साखर कारखान्यांनी ऊस तोडीची यंत्रणा वाढवली पाहिजे.