पुणे : थेऊर येथील यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खोकलाई देवी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, यशवंत कारखान्याची २२५ एकर जागा आहे. या जागेपैकी १०० एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कुठेही कमी पडणार नाही.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात विकासाच्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित पवार होय. कष्टकरी, शेतकरी, मजूर, पाणी पुरवठा योजना, लाडकी बहिण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी मदत आदी अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी, नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष कांचन, प्रवीण काळभोर, अमित कांचन, जितेंद्र बडेकर आदी उपस्थित होते.