सोलापूर : यंदा पावसाने दडी मारल्याने राज्यात उसाचे क्षेत्र घटणार आहे. त्यामुळे सोलापूर साखर कारखान्यांनी ऊस मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा सुरू झाली आहे. जास्त ऊस मिळवण्यासाठी साखर कारखाने बक्षीस जाहीर करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली. तर खासदार धनंजय महाडिक यांच्या भिमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा १२५ रुपये जादा दराची घोषणा केली आहे.
विठ्ठल कारखान्याने शंभर टन ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन १० रुपये, अडीचशे टनासाठी १५ रुपये, पाचशे टनासाठी २५ रुपये तर एक हजार टनासाठी ५० रुपये जादा दर देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याच्या या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की, बक्षीस योजनेमुळे कारखान्याला चांगला साखर उतारा मिळेल. जादा ऊस मिळण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस योजना जाहीर केली. तशीच स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी साखर उताऱ्यानुसार २३०० ते २५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर केला आहे. टेंभुर्णीतील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सर्वात आधी २५०० रुपये दर जाहीर केला. तर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २५५० रुपये दर जाहीर केला.