नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपनी (OMC) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL), हरित ऊर्जा क्षेत्रात तेजीने क्षमता विस्तार करीत आहे. कंपनीने इथेनॉलसारख्या स्वच्छ वाहन इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्हीएस) चार्जिंग स्टेशनला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) द्वारे नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बीपीसीएलचे कार्यकारी संचालक पी. एस. रवि यांनी सांगितले की, बीपीसीएल आपल्या इथेनॉल उत्पादन क्षमतेचा गतीने विस्तार करीत आहे. कार्बन डायऑक्साइडसारख्या हानीकारक गॅसचे उच्च प्रमाणात उत्सर्जन करणाऱ्या पेट्रोलियम आधारित जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये उच्च इथेनॉल मिश्रणावर भर देत आहेत.
ते म्हणाले की, आम्ही सद्यस्थितीत दरवर्षी ५ बिलियन लिटर इथेनॉल उत्पादन करू शकतो. आणि मागणी जवळपास १० बिलियन लिटरची आहे. त्यासाठी आम्ही आधीच नवा प्लांट उभारण्यास सुरुवात केली आहे. यातून कमीत कमी ७.५ बिलियन लिटर प्रती वर्ष क्षमता जोडली जाईल. त्यामुळे आमची एकूण इथेनॉल उत्पादन १२.५-१३ बिलियन लिटरपर्यंत वाढेल.
याबाबत डेटावरून दिसून येते की, २०१९-२० नंतर भारतामध्ये इथेनॉल मिश्रण गतीने वाढत आहे. २०१९-२० मध्ये जीवाश्म इंधनामध्ये जवळपास ५ टक्के इथेनॉल मिश्रणापासून, २०२२-२३ मध्ये भागिदारी वाढून ११.७ टक्के झाली आहे. गेल्या १० वर्षात, इथेनॉल उत्पादनामध्ये १,१०० टक्के (२०१३-१४ पासून अधिक) वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेबंर २०२२ साठी निर्धारीत १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट जून २०२२ मध्ये गाठणे शक्य झाले.