साओ पाउलो : 2023- 24 हंगामात ब्राझील विक्रमी 677.6 दशलक्ष मेट्रिक टन उसाचे उत्पादन करेल, असा अंदाज सरकारी एजन्सी कोनॅबने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे. याचाच अर्थ मागील वर्षाच्या तुलनेत 10.9% उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कोनॅबने व्यक्त केलेला हा अंदाज ऑगस्टमधील 652.9 दशलक्ष टनाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. अनुकूल हवामानामुळे उसाचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी, जगातील आघाडीचा साखर निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या साखर उत्पादनात 27.4 टक्के वाढ होऊन 46.88 दशलक्ष टनांचा ऐतिहासिक उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
कोनॅबने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दर आणि मागणीत झालेली वाढ लक्षात घेता जास्तीत जास्त ऊस साखर उत्पादनासाठी वापरला जाण्याची अपेक्षा आहे. ऊस आणि कॉर्न या दोन्हीपासून ब्राझीलच्या एकूण इथेनॉल उत्पादनात 9.9 टक्के वाढ होण्याचा अंदाज कोनॅबच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ऑगस्टमधील 33.83 अब्ज लिटरच्या आधीच्या अंदाजापेक्षा आता इथेनॉल उत्पादन 34.05 अब्ज लिटरपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.