साओ पाउलो : २०२१-२२ या गळीत हंगामात ब्राझिलच्या दक्षिण भागातील याआधीच्या ५८६ मिलियन टन ऊस गाळपाच्या अंदाजात घट येण्याची शक्यता आहे. सुधारित अनुमानानुसार, ५६७ ते ५७८ मिलियन टनापर्यंत ऊस गाळप होऊ शकेल असे साखर उद्योगातील तज्ज्ञ स्टोनएक्सने म्हटले आहे.
मार्च आणि एप्रिल यांदरम्यान या विभागात झालेला पाऊस सरासरीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी होता. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे असे स्टोनएक्सच्यावतीने सांगण्यात आले. साखरेचे उत्पादन आपल्या आधीच्या अनुमानापर्यंत, ३६ मिलियन टनापर्यंतच पोहोचेल अशी अपेक्षा स्टोनएक्सने व्यक्त केली आहे. कमी ऊस उत्पादन झाले तरी इथेनॉल उत्पादनात कपात करून साखरेचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. यासोबतच ब्राझिलमध्ये साखर कारखान्यांचा या हंगामातील गाळप कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादनासाठी आवश्यक ऊस जादा प्रमाणावर उपलब्ध होईल. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्राझिलमध्ये यंदा ऊस उत्पादन ५३० मिलियन टनापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.