नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या परवानगीनुसार त्यांनी ६.१ मिलियन टन साखर निर्यात केली आहे. मात्र, उत्पादनातील संभाव्य घसरणीमुळे केंद्र सरकार अतिरिक्त निर्यातीस परवानगी देण्याची शक्यता नाही, असे साखर उद्योगातील अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले. यामुळे जागतिक स्तरावर साखरेच्या दरामध्ये वाढ होवू शकते. आणि सर्वात मोठा उत्पादक असलेल्या ब्राझीलला जागतिक बाजारात जादा साखर विक्री करण्याची संधी मिळाली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, कारखान्यांनी आपल्याला मिळालेल्या कोट्यातील सर्व साखर निर्यात केली आहे आणि आता जागतिक स्तरावर किमती चढ्या असतानाही निर्यातीसाठी साखर शिल्लक नाही. डीलर्सनी सांगितले की, कारखान्यांना देशांतर्गत ३६,५०० रुपये किमतीच्या तुलनेत परदेशात विक्रीतून प्रती टन ५०,००० रुपये (६०४ डॉलर) पेक्षा अधिक मिळत आहेत.
देशाने गेल्या २०२१-२२ या हंगामात उच्चांकी ११ मिलियन टन निर्यात केली होती. मात्र, उत्पादनातील घसरणीमुळे सरकारने चालूवर्षी केवळ ६.१ मिलियन टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. चालू वर्षात उत्पादन घटून ३२.८ मिलियन टन राहील अशी शक्यता आहे. तर गेल्या हंगामात उत्पादन उच्चांकी ३५.८ मिलियन टन झाले होते. भारत मुख्यत्वे इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिरातला साखर निर्यात करतो.