नवी दिल्ली : ब्राझील फ्लेक्सी फ्युएल वाहनांबाबत भारतासोबत काम करण्यास आणि या क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन अनुभवाचा लाभ देण्यास उत्सुक आहे, असे ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरन्हा कोरिया डो लागो यांनी म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश असलेला ब्राझील हा द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादकही आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या साखर आणि इथेनॉल विषयक परिषदेत बोलताना आंद्रे अरान्हा कोरिया यांनी सांगितले की, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये फ्लेक्सिबल इंधनाचा समावेश असलेल्या वहानांच्या सादरीकरणास २० वर्षे पूर्ण होतील. ते म्हणाले की सध्या देशात विक्री केल्या जाणाऱ्या ९२ टक्के हलकी वाहने फ्लेक्सी फ्युएल इंजिनचा समावेश असलेली आहेत. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये ब्राझीलला प्रमुख भागीदार मानले जात आहे. याबाबत राजदूत आंद्रे अरान्हा लागो यांनी सांगितले की ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
फ्लेक्सी फ्यूएल इंजिन असलेल्या अथवा दुहेरी इंधनाचा वापर केल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये एकापेक्षा अधिक इंधनावर वाहन चालू शकेल याचे डिझाइन करण्यात येते. साधारणतः पेट्रोल अथवा इथेनॉल किंवा मेथनॉल इंधनाचे मिश्रण यामध्ये वापरले जाते. आणि या दोन्ही प्रकारच्या इंधनासाठी एकाच टँकचा वापर केला जातो. कार्बन उत्सर्जन कमी करण्यात इथेनॉल सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. याबाबत आंद्रे अरान्हा कोरिया डो लागो यांनी सांगितले की, दोन्ही देश जैव इंधन आणि जैव ऊर्जा या क्षेत्रामध्ये संयुक्तरित्या काम करीत आहेत. ब्राझीलमधील ॲग्रो बिझनेस ॲनालिस्ट डेटाग्रोचे अध्यक्ष प्लिनीओ नास्तारी यांनी सांगितले की, दुहेरी इंधनाचा समावेश असलेल्या वाहनांना स्वीकारणे हे भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. कारण भारत हा जगातील दळणवळण क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाचा इंधना वापरकर्ता आहे. ते म्हणाले की, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या देशांकडून भारत वाहतूक इंधन परिवर्तनाविषयी शिकू शकतो. भारतात ई १०० (१०० टक्के इथेनॉल, शून्य टक्के पेट्रोल) मानकांचा वापर करणेही शक्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.