साओ पाउलो : ब्राझिलने एप्रिल महिन्यात १.९ मिलियन मेट्रिक टन साखर निर्यात केली असून ती एप्रिल २०२० च्या तुलनेत २५.७ टक्क्यांनी अधिक असल्याचे मीडिया रिपोर्टमधून स्पष्टझाले आहे. मात्र ही निर्यात मार्च २०२१ पेक्षा ३.६२ टक्के कमी आहे.
एप्रिल महिन्यातील साखर निर्यातीतून मिळणारा एकूण महसूल गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत ३८.५ टक्के वाढून ६१५.६ मिलियन अमेरिकन डॉलर झाला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत साखर निर्यातीतील महसुलात ३.८३ टक्क्यांची घसरण झाली आहे. साखर हंगामातील पहिल्या चार महिन्यांत ब्राझिलने ७.७ मिलियन टन निर्यात केली आहे.
२०२१-२२ मध्ये ऊस उत्पादन घटण्याची शक्यता
ब्राझिलच्या दक्षिण-मध्य विभागात २०२१-२२ या हंगामात उसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ५८६ मिलियन टनाच्या तुलनेत ५६७ ते ५७८ मिलियन टनादरम्यान होण्याची शक्यता आहे. मार्च आणि एप्रिल या काळातील पाऊस सरासरीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी होती. त्याचा थेट फटका ऊस उत्पादनावर दिसून येत आहे. मात्र, साखरेचे उत्पादन गेल्यावेळच्या ३६ मिलियन टनाच्या तुलनेपेक्षा कमी असणार नाही. कारण ऊस उत्पादन कमी झाले तरी इथेनॉल उत्पादनात कारखाने कपात करून साखर उत्पादन वाढवू शकतात. काही तज्ज्ञांनी ब्राझिलमध्ये या वर्षी ऊस उत्पादन ५३० टनापेक्षाही कमी होईल अशी भीती व्यक्त केली आहे.