नवी दिल्ली : चीनी मंडी
जगातील पहिल्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये साखर कारखाने पुन्हा इथेनॉलकडून साखर उत्पादनाकडे वळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी जगात कच्च्या तेलाचे दर वाढले होते. त्यामुळे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा सुरुवातीपासूनच तेलाचे दर घसरत असल्यामुळे इथेनॉलचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे ब्राझीलमधील उत्पादक इथेनॉलकडून पुन्हा साखर उत्पादनाकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुळात जागतिक बाजारातच साखरेचे दर कोसळलेले आहेत. त्याला साखरेचा अतिरिक्त पुरवठा हे एकमेव कारण आहे. जागतिक बाजारपेठेचे लक्ष प्रचंड साखर साठ्याकडे आहे. येत्या काही महिन्यांत भारत त्यांच्याकडील अतिरिक्त साखरसाठा निकाली काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात साखर निर्यात करणार आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च प्रक्रियायुक्त शुद्ध साखरेचा दर ३२३.६० डॉलर प्रति टन या ऑक्टोबरनंतरच्या निचांकी पातळीवरून ३२४.२० डॉलर प्रति टनपर्यंत स्थिरावला आहे. तर, मार्च कच्च्या साखरेचा दर दोन टक्क्यांनी घसरून ११.६९ सेंट्स प्रति बॅग या तीन महिन्यांतील निचांकी पातळीवर आहे. जागतिक बाजारात साखरेचे प्रमुख विक्रेते एखाद्या सट्टेबाजासारखे वाटत आहेत. पण, सध्याच्या परिस्थितीत त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असे मत सुकडेन फायनाशिअल्सचे वरिष्ठ अधिकारी निक पेन्नी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, ही तर सुरुवात आहे. खरेदीदारांच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे. पण, येत्या काही दिवसांत पुन्हा घसरण पहायला मिळेल, अशी शक्यता आहे, असे मत एका युरोपियन साखर व्यापाऱ्याने व्यक्त केले आहे.