दराची कोंडी फोडा, मगच धुराडे पेटवा : बोरगावच्या ऊस परिषदेत मागणी

सांगली : ऊस दराची कोंडी फोडल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण ऊस दर मिळवूच. राजकारण आणि अर्थकारण या दोन भिन्न बाबी आहेत. राजकारण आणि अर्थकारणाची गल्लत करू नका, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे आयोजित ऊस द्राक्ष बेदाणा परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अनिल पवार, राजेंद्र माने, संजय बेले, भागवत जाधव, सूर्यभान जाधव, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, प्रतीक पाटील, धोंडीराम पाटील, महादेव पवार, महादेव दीक्षित, सागर पाटील, वैभव पाटील, निशिकांत पोतदार, सुभाष पाटील, दत्ता, जाधव सिकंदर, अनिल पाटील, बाळासो खरमाते आदी उपस्थित होते.

खराडे म्हणाले की, शेतकऱ्यांनो ऊस, द्राक्ष, बेदाणा, दूध हाच आमचा पक्ष ही भूमिका घेवून वाटचाल करायला हवी. शेतकरी म्हणून एक व्हायला हवे. याउलट शेतकरी मात्र पक्षीय राजकारणात अडकला आहे. शू खाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत मात्र दूध दर मात्र कमी होत आहेत. गायीच्या दुधाला किमान हमी भाव करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सावकार मादनाईक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने आम्ही बंद पाडले आहेत तरीही अद्याप ऊस दराची कोंडी फुटली नाही. ते कारखाने बंद ठेवायला तयार आहेत, पण दर जाहीर करायची त्यांची तयारी नाहीत. सर्व पक्षीय कारखानदार एक झाले असल्याचेही टीका त्यांनी यावेळी केली. प्रा. अजित हलिंगले यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here