नवी दिल्ली : चीनी मंडी
जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण शुक्रवारी पहायला मिळाली. बाजारपेठेत वाढलेला पुरवठा आणि अर्थव्यवस्थांची मंदावलेली गती आणि व्यापार वादांचा परिणाम तेलाच्या मागणीवर होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर होत आहे. गेल्या एप्रिलनंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रूड ऑइल ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही खाली घसरले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर तेलाच्या किमतीत १८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
ब्रेंट ऑईलचा दर १.५२ डॉलरने घसरून ६९.१३ डॉलरपर्यंत खाली आला. तर, अमेरिकेच्या क्रूड ऑईलचे दर आठ महिन्यांतील निचांकी पातळीवर ६० डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहे. ऑक्टोबरच्या सुरवातीला असलेल्या दरातून २० टक्के घसरण झाली आहे.
मुळात जागतिक तेल बाजारपेठेला अमेरिकेच्या इराणविषयीच्या भूमिकेची चिंता वाटू लागली होती. अमेरिकेने इराणवर निर्बंध घालण्याची तयारी केल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तेल बाजारात भीतीचे वातावरण होते. या निर्बंधांमुळे तेलाच्या बाजारात तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण, या निर्बंधांच्या भीतीमुळेच सौदी अरेबिया, रशिया आणि अमेरिकेतील तेल कंपन्यांनी अतिशय वेगाने आपल्या उत्पादनात वाढ करायला सुरुवात केली. अमेरिका, रशिया आणि सौदीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सुरू केले असून, रोज ३३० लाख बॅरल उत्पादन करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान, अमेरिकेने निर्बंध घालताना इराणच्या मोठ्या तेल खरेदीदारांना दिलासा दिला. येत्या सहा महिन्यांत ठराविक तेल खरेदी करण्याची मुभा अमेरिकेने दिली.
चीनच्या पेट्रोलियम कार्पोरेशनने इराणकडून अजूनही तेल खरेदी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे इराणची तेल निर्यात पूर्णपणे ठप्प व्हावी, यासाठी अमेरिकेचा प्रयत्न आहे. पण, पुढच्या काळात इराणमधून रोज १४ ते १५ लाख बॅरल तेल निर्यात सुरूच राहण्याची शक्यता आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत असलेली मंदी तेलासाठी धोकादायक आहे. मुळात तेल उत्पादक आणि निर्यात देशांतून तेलाची निर्यात व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतींवर कोणताही दबाव येताना दिसत नाही, असे मत बर्नस्टेन यांनी व्यक्त केले आहे.