कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) ए.वाय.पाटील हे जागावाटपावरून बिनसल्याने सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ‘बिद्री’चे अध्यक्ष पाहुणे के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील हे एकमेकाविरोधात शड्डू ठोकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागा आणि कारखान्याचे अध्यक्षपद यावर सन्मानजनक तोडगा निघाला नसल्याने माझे आपल्याशी जमत नसल्याचा निरोप ए. वाय. पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिला. ए. वाय.पाटील यांच्या भूमिकेने सत्ताधारी गटाला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ए. वाय. पाटील हे विरोधी आघाडीबरोबर म्हणजेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबत जाणार कि आणखी काही वेगळा निर्णय घेणार ? याकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सतेत सहभागी अस ए. वाय. पाटील यांनी बैठका घेत राधानगरी तालुक्यातील गट क्रमांक एक व दोन यामधील प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा जागा व बिद्रीचे पहिल्यांदा अध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली होती. यावर काही दिवसापूर्वीच मंत्री मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी चर्चा करून ए. वाय. पाटील यांना तालुक्यातील गतपंचवार्षिक पेक्षा एक जागा वाढवून चार जागा देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. ए. वाय. यांनी मंगळवारी शेळेवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सायंकाळी मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन ए. वाय. पाटील यांनी आपल्याला तो प्रस्ताव मान्य नाही आणि आपले तुमचे जमत नाही. असा निरोप दिला. त्यामुळे ही युती फिस्कटली.