नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प २०२२-२३ मांडताना रसायनमुक्त सेंद्रीय शेतीबाबत काही घोषणा केल्या. केंद्र सरकार गंगा नदीकाठी देशभरात रसायनमुक्त नैसर्गिक तथा सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देईल असे अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केले
त्या म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात गंगा नदीकिनाऱ्यावरील ५ किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर लक्ष केंद्रीत केले जाईल. त्यानंतर देशात रसायनमुक्त शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देईल. केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प मांडताना सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात ज्यांना प्रतिकूल आरोग्य आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले त्या लोकांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते.
सीतारमण यांनी बजेट मांडण्यापूर्वी आयोजित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२२-२३ या बजेटला मंजुरी देण्यात आली. संसदेचे हे बजेटचे सत्र पहिल्या टप्प्यात ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. त्याचा दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत आहे