कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने शनिवारपासून तोडणी व वाहतूक यंत्रणा कामाला लावली आहे. ३० टक्के प्रत्यक्ष ऊस तोडणीची यंत्रणा कामाला लावली आहे. भात सुगीच्या हंगामात ऊस तोडणी मजूर गुंतल्याने पूर्ण क्षमतेने तोडणी यंत्रणा सुरू करण्यात करखाना प्रशासनाला अडचणी येत आहेत. यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्याने बस पाळीचा प्रश्न सुटणार आहे. हंगामातील अडथळे दूर होत असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
कारखान्याच्या गळीत हंगामाचे मोळी पूजन ७ नोव्हेंबरला झाले. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील कारखान्यांच्या शेती कार्यालयातील कर्मचारी शेतकरी व ऊस तोडणी मजुरांच्या भेटी घेऊन ऊस तोडणीसाठी आग्रह करत आहेत. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस झाल्याने अजूनही शेतातून पाणी आहे. त्यामुळे रस्त्याकडील व माळरानावरील ऊस तोडणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे कुंडल यांनी सांगितले. स्थानिक वाहतूक व तोडणी मजुरांनी ऊस तोडणीला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्या बीडच्या ऊस टोळ्यांवर कारखाना सुरू आहे, अशी माहितीही कुंडल यांनी दिली.