पुणे : माळेगाव साखर कारखान्याचे विरोधी संचालक सत्तेत असताना कधीही त्यांनी आडसाली उसाचे जानेवारीमध्ये पूर्णपणे गाळप केले नव्हते किंबहुना ते मार्चपर्यंत गेल्याची आकडेवारी आहे. आमच्या मागील तीन वर्षांच्या कालखंडात आडसाली ऊस जानेवारी महिन्यातच पूर्णपणे गाळप केल्याची आकडेवारी आहे. यंदादेखील जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या आडसाली उसाचे गाळप करण्याचा निश्चय आहे. यासाठी सध्या ८० टक्के सभासद आणि २० टक्के गेटकेन, असे प्रमाण दैनंदिन गाळपाचे आहे, असे प्रत्युत्तर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवबापू जगताप यांनी दिले आहे.
विरोधकांनी हलगी मोर्चाच्या अनुषंगाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष जगताप बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, संचालक तानाजी कोकरे, मदन देवकाते, अनिल तावरे, स्वप्निल जगताप, सुरेश देवकाते आदी उपस्थित होते. कारखान्याने पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन दिलेली असली, तरी नंतरदेखील आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देत असतो. तथापि काही कारखानदार पहिल्या उचलीवरच पूर्णबिराम करतात. माळेगाव कारखान्यावर गेटकेनधारकांचा विश्वास असल्याने गेटकनधारक माळेगाव कारखान्याला आपला ऊस देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, असेही ॲड. जगताप यांनी सांगितले.