नवी दिल्ली : चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये देशात ३१० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल असे अनुमान आहे. तर देशांतर्गत साखरेची मागणी २६० मेट्रिक टनापर्यंत आहे. ग्राहक संरक्षण, नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरानुसार, यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर कारखान्यांनी २२२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले, साखरेचा जादा साठा कमी करण्यासाठी सरकारने चालू गळीत हंगामात निर्यातीसाठी ६० लाख टनाचा कोटा कारखानानिहाय उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, सरकार साखर कारखान्यांना ऊसाचा रस, साखर, मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यातून अतिरिक्त साखर साठ्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. सरकारने साखर कारखान्यांना जादा साखर उत्पादन कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे असे दानवे म्हणाले.